Categories
Uncategorized

अनुभवलेला अभेद्य, बेलाग राजगड..!

राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजेच किल्ले राजगड. जिथे छत्रपती शिवराय वावरले, शंभूराजे बागडले, जिथे स्वराज्याच्या मार्गदर्शीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी संभाजी राजेंना घडवले. जिथे तान्हाजींनी कोंडाणा स्वराज्यात आणण्याचा विडा उचलला. असा शिवरायांच्या आयुष्यातील अनेक ऐतिहासिक घटनांचा, मराठ्यांच्या शौर्याशाली चित्तथरारक आणि थरकाप उडवणाऱ्या इतिहासाचा साक्षीदार. जिथे सुवर्ण इतिहास घडला..असा अभेद्य,बेलाग राजगड.

राजगड स्वराज्याची पहिली राजधानी. शिवरायांनी सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे 24 वर्ष राजगडावर व्यतीत केला. शिवरायांनी वयाच्या 16 व्या वर्षी तोरणा जिंकुन स्वराज्याचे तोरण बांधलं. तोरणेवर जो खजिना सापडला त्या खजिन्याचा वापर करत शिवरायांनी स्वतःच्या देखरेखाली मुरुंबदेवाच्या डोंगराला तटा-बुरुजाचे शेलेपागोटे चढवले आणि बनवला तो बेलाग,अभेद्य किल्ले राजगड.. असा अभेद्य बनवला की त्याच्या तटा-बुरुजावरून मुंगी ही आत येवु शकत नव्हती. त्यातच नैसर्गिक अभेद्यता ही लाभलेली.. जमिनीपासून 1394 मीटर उंची म्हणजे जवळपास दिड किलोमीटर काळजाचा ठोका चुकवणाऱ्या उंच-उंच कातळ तासलेल्या कडा..आणि खाली नुसते पाहिले तरी चक्कर येईल, जिथे नजरही पोहचत नाही अश्या खोलच खोल दऱ्या… अशी निसर्गाची मुक्त उधळण असणाऱ्या किल्ले राजगड बद्दल बरेच काही वाचले होते,ऐकले होते. प्रा.एस.एस चव्हाण सरांचा ‘किल्ले राजगड-स्वराज्याची दुर्लक्षित राजधानी’ हा लेख वाचला होता. हा लेख वाचल्यानंतर राजगड अनुभवायची प्रकर्षाने इच्छा झालेली. राजगड अनुभवायची संधी मिळाली ती इस्लामपूरच्या संतोषदादांमुळे.. राजगड ला जायचा निर्णय झालेला. 22 नोव्हेंबर 2020 ला पहाटे 5 वाजता इस्लामपूर मधून निघायचे होते. पण निघायला जवळपास 7 वाजले. आमचा ग्रुप 15 जणांचा होता. त्यापैकी सात चिमुकले होते. तर आठ मोठी लोक होती. अर्थातच चिमुकल्यानमुळे जबाबदारी वाढलेली. आमच्या ग्रुपचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रुप मध्ये कोणत्याही एका वयोगटातील लोक नव्हती. अगदी सहा वर्ष्यापासुन पन्नास वर्षापर्यंत च्या प्रत्येक वयोगटातील व्यक्ती होत्या. माझ्यासाठी आदिती, आयुष, संतोषदादा सोडले तर सर्व अनोळखी होते. त्यामुळे पदभ्रमंतीला जाताना एक प्रकारची भीती ही वाटत होतो. आपल्या सोबत येणारी लोक कशी असतील. लोकांना प्रेमाने आपलंसं करण्याचा हातखंडा असल्याने आत्मविश्वास ही होताच.

आम्ही राजगड च्या दिशेने निघालो. बालचमू कडून शिवरायांच्या नावाची आरोळी दिली जात होती. लवकरच 10:30 वाजता आम्ही गुंजवणे गावात पोहचलो. बऱ्याच जणांकडून ऐकून होतो.’गुंजवणे मार्गे गड चढायला खुप अवघड आहे, गुंजवणे मार्गे जावु नका.’ आमच्यापैकी अनुभव लोकांनी गुंजवणे मार्गेच गड सर करायचा निर्णय घेतला. शिवरायांचे मावळे आहोत. अवघड मार्गाला थोडीच भिणारे होतो. येणाऱ्या संकटांना दोन हात करत लढायला तयार होतोच. अर्थात सांगणाऱ्यांचा उद्देश किंवा त्यांचा अनुभव अजिबात चुकीचा नव्हता. पण आम्हाला सह्याद्रीची खडतरता अनुभवायची होती.

गुंजवणे सुंदर गावं, गावातून निघतानाच जुन्या बांधकामातील विहीर दिसली. निळेझार, सुंदर पाणी होत. पुढे भात शेती ही दिसत होती. आम्ही दृश्य डोळ्यात साठवत गड सर करू लागलो. गडाच्या सुरवातीपासून खडतरता चालु झालेली.आजूबाजूला गर्द झाडे, त्यामधून असणारी सुंदर खडी पायवाट. गड सर करायला सुरुवात पण झाली नव्हती तर सर्वांची दमछाक सूरु झालेली. चिमुकल्यांचा विचार करत सुमारे 300 मीटर वरती चालत गेल्यानंतर आल्पोआहारासाठी थांबलो. आल्पोआहार झाल्यानंतर मोठ्या जोशात पुन्हा गड सर करायला लागलेले. आमच्या पदभ्रमंती चे नेतूत्व 51 वर्षाचे बापु करत होते. बापूंचा गडभ्रमंतीचा तारुण्यापासूनचा दांडगा अनुभव. याआधी बापूंनी 3 एक वेळा राजगड सर केलेला. लहानग्यांवर संस्कार व्हावेत, त्यांना महाराज समजावे, निसर्गावर जीव जडवा, सह्याद्रीची भव्यता लक्षात यावी म्हणून लहानग्यांना गडकोट दाखवण्याचा अट्टाहास.

जंगलातुन गड सर करत होतो. आता पायवाट थोडी छोटी झालेली. बाजूस गर्द झाडी..त्यातून होणारे सह्याद्रीचे दर्शन विलोभनीय होत. पुढे राजगड चा बालेकिल्ला, सुवेळा माची, सुवेळा माचीवरील नेढ (मोठ्या डोंगराला, दगडाला बरोबर मध्यभागी पडलेले भगदाड) लहान दिसत होतं. निसर्गाच्या मुक्त उधळणीचा आनंद घेत आम्ही बऱ्याच उंच येवुन पोहचलेली. जमिनीपासून किमान अर्धा किलोमीटर उंच चालत पोहचलेली. आता लागणार होता तो अतिशय खडतर पहिला टप्पा..खडा कडा होता.त्यावरून उंच-उंच दगडी पायऱ्या..सहजा सहजी पायरीवरून वरती जाता येत नव्हतं. कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय जाणं आता शक्यच नव्हतं, पूर्वी लोक कसे वर जात होते हे आश्चर्यच आहे. आम्ही एकमेकाला सावरत त्या पायर्‍यावरून वरती जात होतो. बाजूस ज्या लोखंडी पाईपा होत्या त्यांचा आधार घेत होतो. थोडीजरी गफलत झाली तर जीवानिशी जाणार होतो. डाव्या हाताला खोल दरी होती. आम्ही लहानग्यांना एकमेकांच्या आधाराने वर चढवत त्या खडतर मार्गाच्या माध्यभागी पोहचलो. आता थोडसं वळण होत. खालून वर जाणारे व वरून खाली येणारे एकत्र झाले. अरुंद रस्ता कोणालाच काही करता येईला. मागे ही फिरता येत नव्हते.पुढे ही जाता येत नव्हते. मोठा पेच प्रसंग उभा राहिला. काही चिमुकल्यांच्या डोळ्यांतून पाणी येवु लागले. चिमुकल्यांना आधार देत पहिल्यांदा खालून येणाऱ्यांना वरती जाऊ दिले. त्यावेळी वरील लोकांनी लोखंडी पाईपेचा आधार घेत वरती जाणाऱ्या लोकांना आधार दिला. अवघड मार्ग पार करत आम्ही पोहचलो चोर दरवाजा जवळ..मनोमनी आनंद झाला.वाटलं गड सर झाला आम्ही जिंकलो.पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. गड अजून खूप सर करायचा होता. चोरदरवाज्याचे अभेद्य बांधकाम डोळ्यात साठवत आम्ही पद्मावती माचीकडे निघालो. आता रस्ता थोडा सपाट लागलेला. बाजूस भलेमोठे सुंदर तळे दिसले. तळ्याच्या दरवाजावरून व बाजूच्या बांधकामावरून पूर्वी तळे बंदीस्त असावे असे वाटते.पण काळाच्या ओघात ते नष्ट झाले असावे. पुढे डाव्या हाताला आधुनिक पर्यटक विश्राम गृहाचे बांधकाम होते. पण त्याची ही दुर्लक्षामुळे दयनीय अवस्था झालेली. पुढे पद्मावती माचीवर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाई साहेब यांची समाधी होती. समाधीच्या बाजूच्या कट्यावर काही महिला चप्पल, बूट घालून बसल्या होत्या. त्यांना त्या वास्तुच पवित्र समजलेच नव्हते. काय बोलणार जाऊदे म्हंटले. बापू पुढे येत त्यांना तिथून उठायला लावले. वास्तुच पवित्र समजावून सांगितले. समाधी पुढेच मराठ्यांच्या सुवर्ण इतिहासाचा साक्षीदार असलेला दीपस्तंभ मोठ्या डोलात 350 वर्षा नंतर ही उभा आहे. न जाणे त्याने किती संकट आजपर्यंत झेलली असतील. बाजूस स्वराज्यावर वाकड्या नजरेने बघणाऱ्या शत्रूवर तुटून पडणारी आज भग्नावस्थेत असणारी तोफ दिसली. दुःख या गोष्टीच होतंय, इतका मोठा गड, पण गडावर एकही सुस्थितीत असणारी तोफ दिसली नाही. दिसले तर तोफेचे झालेले अनेक तुकडे,जे आजही सहजासहजी उचलता येत नाहीत. पुढेच पद्मावती मंदिर होते. बऱ्याच पर्यटकांनी मंदिरात मुक्काम केलेला. मंदिराचे पूर्ण जुने दगडाचे व सागवानी लाकडाचे बांधकाम आहे. मंदिरात महाराजांची व पद्मावती देवीची सुंदर मुर्ती आहेत. त्याठिकाणी पर्यटकांना जेवणाची सोय ही होते. मंदिराच्या उजव्या बाजूस शिवकालीन पाण्याचे टाके आहे. त्या टाक्यांमध्ये बारा महिने बर्फासारखे गार पाणी असते. जे आजही पिण्यासाठी वापरतात. पुढे जाताना महादेवाचे मंदिर दिसले ते ही अशाच प्रकारचे.थोडं पुढे आल्यानंतर भव्य सदरेची इमारत दिसत होती. बाजूस वाचणाऱ्यासाठी मनपरिवर्तन करणाऱ्या पाट्या होत्या. त्यावरील मजकूर अशा प्रकारचा अरे तो दिल्लीपती औरंजेब किल्ले ताब्यात घेऊ शकला नाही. पण तुम्ही फेकलेली प्रत्येक प्लॅस्टिकची बॉटल त्या औरंजेबाचं गड ताब्यात घायचं स्वप्न पूर्ण करतेय..!बाकी आतापर्यंत मी सर्वांमध्ये कधी मिसळून गेलेलो कळलंच नव्हते. माझी व सर्वांची फार फार वर्षा पूर्वीची ओळख आहे वाटत होते.

बरेच पुढे चालत आल्यानंतर संजीवनी माची, सुवेळा माची व बालेकिल्ला याठिकाणी जाणारे मार्ग दिसले. तत्पूर्वी आम्ही एका मोठ्या भगव्या ध्वजाजवळ, एका बुरजा शेजारी जेवण करून घेण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाने हातावर सॅनिटाइझर घेतले. (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळो वेळी हातावर सॅनिटाइझर घेत होतो.) मस्तपैकी जेवण झाले. जेवणानंतर आमच्याकडून झालेला कचरा एकत्र करत बाजूच्या कचरा कुंडीत टाकला. बापूंचा आदेश व संस्कार होते, सार्वजनिक ठिकाणी, गडकिल्ल्यांवर कुठेही कचरा करायचा नाही. त्यामुळे सहा वर्षाचा कार्तिक असो वा 51 वर्षांचे बापु असोत स्वतःचा कचरा स्वतः कचरा कुंडीत टाकायचा. जर मोठ्यांनी कचरा तिथेच फेकून दिला असता तर लहानांना तेच अनुकरण केलं असत. जेवणानंतर बालचमू बुरजावर खेळत होते. आम्ही मोठे ही बाजूस होतो. अथर्व, आयुष हातातील काठी तलवार आहे हे समजून बुरुजा वरून वाऱ्याच्या दिशेने उगरत होते. जणू गनीमाला सांगत होते. ‘हा महाराजांचा गड आहे, खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या…’

पुढे जेवणानंतर आम्ही संजीवनी माचीकडे निघालो.उंच कडा व खोल दरी यामधून जाणारी चिंचोळी पायवाट होती. पाषानाचा कातळ बघत, सुंदर निसर्ग न्याहळत आम्ही निघालो होतो. पण जाताना काळजी घ्यावी लागत होती कारण काही ठिकानी पायवाट ही खचलेली होती. खचलेला पायवाट तुडवत, लोखंडी पाईपेचा आधार घेत पुढचा प्रवास चालु होता. खाली अभेद्य पाली दरवाजा दिसत होता. बरेच अंतर चालून आल्यानंतर आम्हाला संजीवनी माची दिसत होती. सुमारे एक किलोमीटर लांबीची संजीवनी माची खुप सुंदर दिसत होती. बुरुजावर आजही भगवा डौलाने फडकत आहे. दोन भिंतींच्या मध्ये दिसणारी नाळ लांबून खुप छोटी वाटत होती. जवळ गेल्यानंतर खूपच मोठी असल्याचे कळले. तीन फूट रुंद, 25 ते 30 फूट खोल नाळ, सुमारे 1 किलोमीटर होती.चार फूट रुंदीची हजारो फूट खोल असणाऱ्या कठड्यावर जशी पट्टीने रेघ मारावी तरी बरोबर उभी केलेली मोठं-मोठ्या दगडांची भिंत आश्चर्यकारक होती. संजीवनी माचीला एकूण 11 बुरुज होते. जसा डोंगर आतबाहेर जात होता तसी भिंत ही आतबाहेर जात होती. बुरुजाला खाली जाण्यासाठी वाट होती. बुरजाखालील वाट आम्ही टॉर्च च्या साह्याने पार करत खाली उतरलो. परत खोल दरी दिसत होती. पुढे आम्ही संजीवनी माचीवरील कातळकड्यावर उभी असणाऱ्या भिंतीवरून चालत पुढे निघालो. अक्षरशा हृदयाचे ठोके वाढलेले. सह्याद्रीची भयनकता लक्षात येत होती. थोड्याच वेळात आम्ही संजीवनी माचीच्या मुख्य बुरुजावर पोहचलो. मागील बाजुस कातळकड्यावर उभा असणारा उंच उंच बालेकिल्ला दिसत होता. तर पुढे स्वराज्यातील पहिला किल्ला तोरणा दिसत होता. स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गराज किल्ले रायगड ही दिसत होता. राजगड वरून सिंहगड, प्रतापगड, पुरंदर असे कित्येक बुलंद किल्ले मोठ्या डोलात उभे असलेले दिसतात. संजीवनी माचीवरून आम्ही आता मागे निघालो. महाराजांचे मावळे पूर्वी इथे असे उभे असतील. कसे उभा राहून नजर ठेवली असेल अशी कल्पना आमच्यापैकी सोन्याभाऊ रंगवत आणि आम्हाला सांगत. अभिमानाने छाती फुलून येत होती. अर्धा एक किलोमीटर पायवाट तुडवत बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो होतो. हरिभाऊ, गणेशभाऊ, सोन्याभाऊ यांनी आपल्या विनोद बुद्धीने पदभ्रमंतीत रंगत आणलेली थकवा कुठल्या कुठं निघून गेलेला. आता रात्रीच्या जेवणासाठी जीर्ण झालेली लाकडे अनुभवी गणेश भाऊ व सुभाष काकांनी पुढे होत गोळा केली.

आता आम्ही बालेकिल्ल्याच्या रोखाने निघालो. समोर बालेकिल्ला दिसत होता. आता पुन्हा लागणार होता तो खडतर उभा कडा. त्याचवेळी 70 ते 80 वर्षांच्या आजी गड सर करताना दिसत होत्या. तरुणांना लाजवेल असा उत्साह होता. त्यांच्याकडे बघुन उत्साह वाढत होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पाठीवर ओझं होत. अशा परिस्थितीत तो उंच कडा सर करायचा होता. बाजूस खोल दरी दिसत होती पण गड सर करायचं स्वप्न उराशी बाळगलेले. डोळ्यासमोर मराठ्यांचा ज्वलंत, जाज्वल्य इतिहास होता. अंगात दहा हत्तीचं बळ आलेलं. थोडी जरी गफलत झाली असती तर जीवानिशी जाणार होतो. लहान आयुष, कार्तिक, अथर्व यांना मोठ्यांचा आधार देत गड सर करत होते. छोटे आदिती, अभि, शंभू, दिगंम्बर हे ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत गड सर करत होते. ओंकारची तर पहिलीच पदभ्रमंती तो ही मोठ्या जोमात, उत्साहात गड सर करत होता. संतोषदादा मागील आघाडी सांभाळत होते. अनुभवी सुभाष काका मोलाचे मार्गदर्शन करत होते. गणेश दादा धाडसी योगदान देत होते. एकमेकांच्या साथीने आम्ही गड सर केला आणि दिसला तो बुलंद महादरवाजा (बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार ज्याला अनन्यसाधारण महत्व आहे.) आता गड जिंकल्याचा आनंद होता.

भव्य महादरवाजातून आत येत थोडे पुढे चालत आल्यानंतर जननी मातेचे मंदिर लागले. अजून पुढे गेल्यानंतर उंच दगडी बांधकामाच्या पायऱ्या होत्या. चालत वर गेल्यानंतर पुढे चंद्रकोरीच्या आकाराचे पाण्याचे चार मोठी टाके लागले तिथेही बर्फासारखे गार पाणी होते. पुढे ब्रम्हेशवराचे मंदिर लागले. त्या ठिकाणी मुक्काम करण्याचं निर्णय घेतलेला. भागाची मस्तपैकी स्वछता करून घेतली. पाच वाजून गेलेलं. दिवसभर पाठीवर ओझं घेऊन केलेल्या भ्रमंती मुळे शरीर थकले होते. आम्ही गार पाण्यात फ्रेश होवून पुन्हा त्याठिकाणी आलो. जेवणाची तयारी चालली होती. मी आयुष, दिगंबर, शंभू, अभि वरती मुख्य बालेकिल्ला बघण्यासाठी गेलो. सूर्यास्ताची वेळ होती. शिवरायांनी ज्या वास्तूत वास्तव्य करायचे त्या वास्तू समोर आम्ही उभे होतो. मनात विचार आला,’महाराज याच पायऱ्यांवरून चालत गेले असतील’ त्या पायऱ्यांनी आम्ही उजव्या हाताने स्पर्श केला. न जाणे का भावुक वातावरण झालेलं. बराच वेळ मुख्य बालेकिल्ल्यात होतो. खालुन काळजीपोटी बोलावणे आले. सर्वांच्यात मीचं मोठा असल्याने सर्वाना जबाबदारीने खाली घेऊन आलो. राजगड वरून सूर्य मावळताना पाहण्याचं भाग्य मिळालं होतं. सूर्यास्ताच सुंदर दृश्य अविस्मरणीय होत. जेवणासाठी सर्वजण मदत करत होतो. आता अंधार झालेला. बॅटरीच्या उजेडात जेवणाची तयारी चालू झालेली. गडाच्या पायथ्यापासून मोबाईलच नेटवर्क पूर्णपणे गेलेलं. वेगळया सुंदर जगात गेल्याचा भास होत होत. एकदा पुढे गेलो की मागे काय चालले आहे याचा विचार न करणे ही माझी सवय.. कुठे जाईल तिथे नवीन जग शोधत भटकत असतो. छोटा अथर्व न जेवताच झोपी गेलेला. पायथ्याच्या गावातील बल्ब मुळे जणू चांदन्यानच्याही वर असल्याचा भास होत होता. बापूंच्या हातची गरमा-गरम भात आमटी तयार झालेली. सर्वांनी ताट करून घेतली. गप्पा मारत जेवण चालु होत. जगातल्या कसल्याच हॉटेल ला सर येणार नाही असं जेवण केलेलं बापुनी.. अप्रतिम.. जेवणानंतर झोपायची तयारी चालू झाली. मेणबत्ती लागल्या.. सर्वजण थकून आडवे पडलेले.10फुट रुंद,15फुट लांब जेमतेम 6 फूट उंचीच्या छोट्याश्या मंदिरात आम्ही आडवे पडलेलो. इतिहासाच्या गप्पा ही रंगलेल्या.12 वर्षाच्या छोट्या अदितीने महाराजांचा पोहाडा हातवारे करत म्हणून दाखवला.शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तु, मेणबत्ती चा लखलखता उजेड, त्यात छोट्या अदितीने हातवारे करत म्हणुन दाखवलेला महाराजांचा पोहाडा स्पृरण चढवनारा होता. याची देही,याची डोळ्या पाहण्यासारखे दृश्य होत. उद्याचा प्रवास कसा असेल याची कल्पना करत झोपी जात होतो. लांब पल्ल्याची पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती दरम्यान केलेल्या मुक्कामाची आठवण झालेली.(शिवकाळात घेवुन जाणारी ‘पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती’ हा लेख वाचायचा असेल तर कळवा.) या पदभ्रमंतीचा अनुभव असल्याने उद्याचा प्रवास सुखकर होणार याची खात्री होतीच.

पहाटेची कुणकुण लागलेली. पहाटे गप्पा रंगलेल्या. मी शांत झोपुन सर्व ऐकत होतो. तेवड्यात बापूंचा आवाज आला,’रवि उठ, आवरून पुढे जायचं आहे’. बापूंचा आवाज ऐकताच उठलो. थंडगार वातावरण होत. दात घासुन, बर्फासारख्या पाण्याने कुडकुडत तोंड घुतले. चूल पेटलेली.आले, वेलदोडे, डालचिनी चा मस्त कोरा चहा तयार झालेला. एकेकाने चार-चार कप चहा घेतला. झालेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली. 15 मिनिटात सर्वांनी परिसराची स्वछता केली. सूर्योदय होताना दिसत होता. कोवळी किरणे अंगावर पडत होती. आता मुख्य बालेकिल्ला बघण्यासाठी वर निघालो. मुख्य बालेकिल्ल्यातून सहज नजर टाकल्यानंतर लक्ष्यात आले की संपुर्ण गडावर काय चालले आहे हे बालेकिल्ल्यातून दिसते. आम्ही सर्वात उंचीवर होतो. बाजूचे कित्येक किल्ले दिसत होते. याच बालेकिल्ल्यातून माँसाहेब जिजाऊंनी शिवबांना कोंढाणा स्वराज्यात आणण्याचं वचन मागितले. अशा तेजस्वी वास्तू मध्ये आम्ही होतो. बालेकिल्ल्या समोर कसल्यातरी इमारत होत्या. पुढे कातकठड्यावर उभ्या दोन कमानी दिसत होत्या.1394 मी खोल दरीच्या काटोकाट एवढ्या मोठ्या दगडाच्या कमानी कश्या उभ्या केल्या हे ही पदभ्रमंती दरम्यानच्या अनेक आश्चर्यापैकी एक आश्चर्य होत. कमानीतून सुंदर सुवेळा माची दिसत होती. मुख्य बालेकिल्ल्यात चूल सदृश्य दगड मांडलेले दिसत होते. महाराज याच चुलीवरील जेवणं जेवले असतील अशी चर्चा चालू होती. चुलीमध्ये आलेलं गवत काडून ती आम्ही स्वच्छ केली.पुढे आम्ही बालेकिल्ल्याच्या पुढे थोडं खाली उतरलो. अनेक इमारतींचे अवशेष दिसत होते.आता आम्ही तेथुन मुक्काम केलेल्या मंदिराकडे निघालो. हजारो फूट खोल दरीवर बांधलेल्या तटबंदी वरून चालत होतो. पुढची आघाडी माझ्याकडे होती. माझ्या मागे चिमुकले होते. हृदयाची स्पदने वाढलेली. हळुवार सावध पावले टाकतो होतो. थरकाप उडवणारा सहयाद्री अनुभवत होतो. चिमुकल्यांकडे मागे बारीक लक्ष ठेवत सावधपणे पुढे घेत होतो. हे सर्व करत असताना भीती दाटून आलेली. मागुन बापूंचा आवाज,’रवी चल की भरा भरा’, बापूंना मनातल्या मनात म्हंटले इथं परिस्थिती काय आहे.

आता पोहचलो मुक्कामाच्या ठिकाणी. साहित्य सोबत घेतले व गड उतरणीला लागलो. महादरवाजातून खाली जाताना पुन्हा कसरत करावी लागणार होती. चिमुकल्यांकडे बघुन येणाऱ्या पर्यटकांना आश्चर्य वाटायचं. एवढ्या लहान वयात पाठीवर भलं मोठं ओझं घेवुन चिमुकल्यानी कसा गड सर केला. दोरखंड सोबत होते. दोरखंडाच्या साह्याने सर्वजण गड उतरू लागलो. खडतर मार्ग उतरल्यानंतर आता जायचं होतं ते सुवेळा माचीकडे.. जवळचे पाणी संपलेले आमच्यापैकी काहींनी पद्मावती माचीवरील टाक्यातून पाणी आणले. पुन्हा सर्वांनी अल्पोपहार केला. सोबत ओझं खुप होत. थकलेलं शरीराने ओझं घेऊन चालणे अशक्य होतं. बॅगा ठेवण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होतो. नंतर पद्मावती मंदिरातच बॅगा ठेवून आम्ही सुवेळा माचीच्या रोखाने निघालो. सुवेळा माचीकडे जाणाऱ्या मार्ग थोडा बदलून खाली दिसणाऱ्या चोर दरवाज्या कडे गेलो. चोर दरवाज्याकडे जाण्यासाठी पुन्हा तो जीवघेणा मार्ग.. चोरदरवाज्यात पोहचलो..वळसा घालून चोर दरवाज्याच्या चौकटी पर्यंत पोहचलो. दरवाज्यातून चिंचोळी वाट दिसत होती. सह्याद्रीची दाहकता लक्ष्यात येत होती. पुढचा धोका ओळखुन पुढे जाणं टाळलं.

आता अभेद्य चोरदरवाजातून वर आलेलो. गडावर असे अनेक चोरदरवाजे दिसतात. आणीबाणी च्या वेळी अशा चोर दरवाज्यातून वरती येत किंवा गडावरील सैन्य सुरक्षित खाली उतरत. सुवेळा माचीचा मार्ग पुन्हा भयाण जंगलातून..चालताना चुकीच्या व्यक्तींकडून इतिहास कश्यपद्धतीने चुकीचा सांगितला जातोय, त्यातून इतिहासाच विकृतीकरण कसे होतंय, भोंदू शिवभक्त यासारख्या विषयावर चर्चा चाललेली. त्यामुळे चालण्यात रंगत आलेली. आता काल काहीच न बोलणारा कार्तिक आज खुप काही बोलू लागलेला. आता ही नुसती पदभ्रमंतीची टीम राहिली नव्हती तर हा परिवार झालेला. मागे उंच-उंच बालेकिल्ला दिसत होता. बरेच चालत गेल्यानंतर नेढ दिसले. खालुन छोटस दिसणारे हे नेढ किती मोठ आहे उमगलेले. नेढ, हत्तीच्या सोंडेच्या आकाराचे,भल्या मोठ्या डोंगराला/पाषानाला मधोमध पडलेलं नैसर्गिक भले मोठे भगदाड. हे भगदाड राजगड च्या सौदर्यात भर टाकत होते.जणू हा सह्याद्रीचा आरसा आहे. हे बघण्यातही पुन्हा खडतर मार्ग होता. नेढ बघून झाल्यानंतर आम्ही चिलखती बुरुजाकडे गेलो. चिलखती बुरुजाची उंची व सुवेळा माचीच्या मुख्य बुरुजाची उंची सारखीच आहे. हे आम्हाला बापुनी दाखवुन दिले. हे ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ट्य होते. चिलखती बुरुज बघून झाल्यानंतर आम्ही सुवेळा माचीच्या दिशेने निघालो. सुवेळा माचीवर पुन्हा संजीवनी माचीसारखा अनुभव. *सुवेळा माचीवर आजही सुस्थितीत असणारे शिवकालीन शौचालय बघायला मिळाले. आम्ही राजगड च्या शेवटच्या टोकावर पोहचलेली. अथांग सह्याद्री सर्वजण न्याहाळत होतो. पुन्हा परतीच्या दिशेने निघालो. अर्धा दिवस गेलेला. सूर्य डोक्यावर होता. सह्याद्रीतील झाडे गारवा देत होती. गड उतरताना ही थरारक अनुभव येत होता. गड अनुभवलेचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता. पुढे एका ठिकाणी झाडाच्या खाली बसून कालच्या चपात्या खात होतो. सोबत विविध प्रकारच्या चटणी होत्या. खराब होणारे अन्न कालच संपवुन टाकलेले. एरवी शीळ अन्न न खाणारे आम्ही तेव्हा शीळ्या चपात्या मोठ्या चवीने खात होतो. जेवणानंतर पुन्हा उतरणीच्या मार्गाला लागलो. मी, आदिती, संतोषदादा मागे राहिलेलो. बाकी सर्वजण पुढे निघून गेले. एका ठिकाणी अंदाजे 80 वर्ष वय असलेल्या आजी दिसल्या. माझ्या पुढे अदिती व संतोषदादा होते. संतोषदादानी आजींना सोबत असणारा सर्व सुखामेवा व काही पैसे दिले, तर आदितीने चिमुकल्यांसाठी घेतलेल्या गोळ्या. आजींच्या चेहऱ्यावर एक आनंदच तेज होत. मी निशब्द होवुन हे बघतो होतो. त्यावेळी तुकोबांचा अभंग आठवला. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें..’तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा..!’आदिती आजीना विचारत होती.’आजी,घरी कोण-कोण असत.’ आजीना बहुतेक कमी ऐकायला येत असावं. आजी म्हणाल्या ‘बाळ, इथ जंगलात कश्याला राहु, मला वाघ निहील की धरून..’ आम्ही पुढे चालत आलो. दोन वेळा वाटा दोन्हीकडे जाताना दिसत होत्या. खालुन पुढे गेलेली आवाज देत होते. सह्याद्रीच आणखी एक वैशिष्ट्य,हाक ऐकीकडून मारली की आवाज दुसरीकडे येतो. त्यामुळे आवाजाची दिशा नेमकी कळत नव्हती. या सह्याद्रीच चुकीने वाट हरवलो तर सह्याद्रीतून बाहेर पडणे महामुस्किल गर्द झाडी मुळे अंधार, जाईल तिकडे झाडेच झाडे, आवाज नेमका कुठून येतो कळत नाही. मोबाईल ला तर नेटवर्कचं नाही.अश्यावेळी सह्याद्रीतून नुसतं भरकटत राहवं लागतं.आणि मनुष्य वस्ती शोधावी लागते. नशिबाने पर्यटक येताना दिसले. त्यांनी गुंजवणे गावाकडे जाणारा मार्ग सांगितला.

गुंजवणे गावात पोहचलो. पुन्हा सूर्यास्ताची वेळ आलेली. जास्त वेळ न दवडता परतीच्या मार्गाला लागलेलो. सुंदर भोरनदी ही पार केली. ऐकून पदभ्रमंतीत शिवरायांच्या विचारशक्तीची, दुरदृष्टीची, मावळ्यांच्या चिवटपणाची, काटकपणाची कल्पना आलेली. मराठ्यांचा ज्वलंत, जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर उभा राहिलेला. राजगडावर आम्ही विरुंगळा घालवण्यासाठी गेलो नव्हतो तर राजगड अनुभवण्यासाठी गेलेलो. गडकोट बघणे म्हणजे नुसत्या पायऱ्या चढून खाली-वर येणे नव्हे तर तेथील घडलेल्या घटनांची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती तेथील साधनानावरून, वास्तूंवरून, स्थानिक लोकांकडून माहिती करून घेणे. आम्ही राजगड शिवकाळात जावुन अनुभवत होतो. यातून लहानांवर संस्कार होत होते. जगण्यासाठी नवी उमेद सकारात्मकता येत होती. नवीन ध्येय, मोठं स्वप्न उराशी बाळगुन ते पूर्ण करायची उर्जा या गडकोटातून आलेली.बापु, गडावर काय बघितले, पदभ्रमंतीचा अनुभव सर्वाना विचारत होते. चिमुकले मोठ्या उत्साहात गडावर काय बघितले सांगत होते. ओंकार ने तर आपल्या पहिल्याच पदभ्रमंतीचा अनुभव सांगितला व पुन्हा पदभ्रमंतीची इच्छा व्यक्त केली. हरिभाऊनी गाडीतील प्रवास सुखकर बनवलेला. इस्लामपूर च्या दिशेने जात असताना. गाडीच्या धडकेत मुत्यूमुकी पडलेली म्हैस दिसली. माझ्या बाजुला बसलेल्या आदीतीने मला प्रश्न केला. *रविकाका, जसे पोलीस माणसांचा अपघात झाला की अपघात करणाऱ्याला शोधुन काढुन शिक्षा देतात तशी म्हैशीला जखमी करणाऱ्यांना शोधुन काढुन शिक्षा देतील का..? महाराज असते तर त्यांनी त्यांना शोधून काढुन शिक्षा दिली असती ना.. मी नि:शब्द झालो. काय बोलावे काही सुचनाच… 12 वर्षाची मुलगी शिवविचार मनात ठेवुन निसर्गाचा, मुक्या प्राणांचा एवढा विचार करते. तर आपल्यासारख्या बुद्धिवंतांना का ते शक्य नाही.? रात्री 8:30 दरम्यान इस्लामपुरात पोहचलो. सर्वांचा पुन्हा सह्याद्रीत भेटण्याच्या अश्वासनावर निरोप घेतला. छोटा अथर्व गाडी चालवणाऱ्या हरिभाऊला Thank you म्हंटला. कार्तिक ला खुप अभ्यास करायचा बघ म्हणत त्याचा ही निरोप घेतला. आयुष घरी बॅग टाकून त्याची शेतातील मांजर खुशीला भेटण्यासाठी गेला. जणू पदभ्रमंती च्या गंमती-जमती तिला सांगणार होता. इस्लामपूर मध्ये मस्तपैकी वहिनीच्या हातचे गरमा-गरम जेवण केले. व सह्याद्रीतल्या असंख्य आठवणी घेवुन घरी परतलो.

प्रतिक (रवि) दिपक पाटोळे.